शिक्षण क्षेत्रात कोचिंग क्लासेसची धोरणे व दिशा...
कोचिंग क्लासेसची संघटना ही खाजगी कोचिंग क्लास चालवणार्या शिक्षकांची संघटना असते...
या संघटनेच्या माध्यमातून खाजगी कोचिंग क्लासेसच्या विविध समस्यांची सोडवणूक सरकार मार्फत, समाजामार्फत,प्रशासनामार्फत अथवा न्यायालयामार्फत सोडवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. संघटना महाराष्ट्रांतील क्लास चालक सभासदांच्या व्यवसाय प्रगतीसाठी तसेच भविष्यात त्यांच व्यावसायिक स्थान सुरक्षित कसे असेल, त्यांच्या विविध व्यावसायिक अडचणींची सोडवणूक कशी होईल यावर लक्ष दिले जावे. हे करत असतांनाच खाजगी कोचिंग क्लासेस हे फक्त त्यांच्या सभासदांच्या व्यावसायिक समस्यांची दखल घेणारीच असावी असे नाही तर ती शिक्षण क्षेत्रात सतत प्रयोग करून, उपक्रमशील राहून, संशोधकता वापरून, शिकवणे मनोरंजक बनवून शिक्षण क्षेत्र गुणवत्तापूर्ण क्षेत्र कसे होईल याकडे पण लक्ष देणे हे कोचिंग क्लासेसच्या संघटनेचा हेतू असावा.
आज शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक गोष्टींमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे. शिक्षण क्षेत्राविषयी सरकारचे अनास्था व निरुत्साह, सरकारची चुकीची धोरणे ज्यामुळे शिक्षण क्षेत्र हे गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून दूर जात असून शिक्षणाचा बट्ट्याबोळ होत आहे असे वाटते. त्यासाठी संघटनेला समाजाची मदत घेऊन संघटनेच्या माध्यमातून काही गोष्टी सरकारच्या निदर्शनास आणून, प्रशासनाच्या निदर्शनास आणून,न्यायालयाची मदत घेऊन आणि त्यावर उपाययोजना होण्यासाठी प्रयत्न करणे. शिक्षण क्षेत्र सतत प्रगती करेल, नावारूपाला येईल, एक सक्षम भारत निर्माण करू शकेल, अशा एका दिशेला नेण्याचा प्रयत्न करणे हे संघटनेचे उद्दिष्ट असावे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे राहील यावर सतत भर देऊन नवनवीन पद्धतीने शिक्षण विद्यार्थ्यांना कसे देता येईल व सक्षम नागरिक सुजाण नागरिक बनवण्यामध्ये कोचिंग क्लासेस चा वाटा जास्तीत जास्त कसा राहील यावर भर देण्याचा प्रयत्न कोचिंग क्लास संघटनेने करत राहावे कारण भारताला एका शैक्षणिक क्रांतीची आवश्यकता आहे.राष्ट्रात परिवर्तन आणायचे झाले, तर शिक्षणात परिवर्तन अपरिहार्य आहे.
भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञ तयार व्हायला पाहिजे, गेल्या कित्येक वर्षापासून नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ भारतात झालेली नाहीत. तीच गोष्ट इतर क्षेत्रातील संशोधनाची आहे.
भारतीय इंटलेक्च्युअल युथची जगभरात मागणी व्हायला पाहिजे. जगातील सर्व देशात महत्त्वाच्या ठिकाणी भारतीय शास्त्रज्ञ, अधिकारी दिसले पाहिजेत.
जगाशी स्पर्धा जर करायची असेल तर ती आधी शैक्षणिक स्पर्धा असावी. शिक्षणाने विद्यार्थ्याचे सर्वार्थाने सक्षमीकरण व्हायला पाहिजे. भारत खऱ्या अर्थाने महासत्ता अथवा विश्वगुरू झालेला दिसला पाहिजे.
भारतात अनेक प्राधान्य असलेल्या विषयांसारखा शिक्षण क्षेत्राला प्राधान्यक्रम दिला पाहिजे.
परंतु सध्या शिक्षण क्षेत्र म्हणजे दहावी व बारावीचे प्रमाणपत्र वाटून, पुढील अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी पुरवणे हेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालेले आहे.
अनुदित शाळांच्या शिक्षकांचा सन्मान होत असतो त्याचप्रमाणे आमच्या संशोधक , मनोरंजक पद्धतीने शिकवणाऱ्या, उपक्रमशील, प्रयोगशील, शिक्षकाला शिक्षण क्षेत्रात काही बदल आणल्याबद्दल उत्तेजना मिळायला हवी मग ते अनुदानित शाळेतील शिक्षक असो खाजगी शाळेतील शिक्षक असो अथवा कोचिंग क्लासेस चे शिक्षक असो त्यांचा सन्मान सत्कार झाला पाहिजे याची सरकारने दखल घ्यावी..
त्यामुळे मोठ्या जिद्दीने शिकवून विद्यार्थ्यांना चांगल्यातला चांगला ज्ञान देण्याचा प्रयत्न खाजगी कोचिंग क्लास चालक करत असल्याने या क्षेत्राला सध्या चांगले दिवस येत राहतील असे दिसते...
हुशार विद्यार्थी व खाजगी शिक्षण संस्था स्टेट बोर्ड पासून दूर जात आहेत आणि इतर बोर्डाचा स्वीकार करत आहेत. स्टेट बोर्ड फक्त अनुदानित शाळांसाठी मर्यादित राहिल असे होतांना दिसत आहे. त्यामुळे सीबीएससी आयसीएससी आयसीएसी, केंब्रिज सारखे विविध गुणवत्तापूर्ण बोर्डाचे शिक्षण देण्याचे काम या खाजगी शिक्षण संस्था आणि त्याचबरोबरीने खाजगी कोचिंग क्लासेस करीत असल्याने खाजगी कोचिंग क्लासेस कडे समाजातील विशिष्ट प्रवर्गात खाजगी कोचिंग क्लासेस व्यवसाय फारच लोकप्रिय होताना दिसत आहे.
शिक्षण क्षेत्रात आरटीई चा कायदा आहे त्याऐवजी खाजगी कोचिंग क्लासेस चालकांमध्ये आरटीक्यूई असा बदल खाजगी कोचिंग क्लासेस चालकांनी केलेला दिसत आहे म्हणजे राइट टू क्वालिटी एज्युकेशन हे खाजगी कोचिंग क्लासेसचे घोष वाक्य असावे.
विद्यार्थ्यांना नवीन नवीन पद्धतीने शिकवणे, मनोरंजक पद्धत वापरून शिकवणे, उपक्रमशील शिकवणे, संशोधकता आणून शिकवणे असे व्हायला हवे ही विद्यार्थ्यांची गरज खाजगी कोचिंग क्लास चालकांनी चांगली ओळखलेली आहे असे आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही.
विद्यार्थी गळती हा विषय शालेय शिक्षणात मोठ्या प्राधान्याने हाताळला जात आहे. यासाठी जर मुक्त शिक्षण व्यवस्था अमलात आणून, योग्य विद्यार्थी डायरेक्ट वयाच्या अटीत बसून बारावीची परीक्षा देण्यास योग्य समजून बारावीच्या परीक्षा फॉर्म भरण्याची अनुमती असेल, अशा (मुक्त शिक्षण व्यवस्थेचा) शिक्षणव्यवस्थेचा अवलंब केला तर शालेय शिक्षणावरचा आर्थिक, सोयीसुविधा पुरवण्याचा, पौष्टीक आहार, इमारती सारख्या महागड्या खर्चापासून बचत होईल आणि कदाचित शिक्षण खाजगी शिकवणी चालकांच्या या व्यवसायाला चांगले दिवस येतील असे वाटते.
सर्व विचार करून पुराणात जशी भारतीय शिक्षण पद्धती (गुरुकुल ) प्रसिद्ध होती अशी नावलौकिक मिळवून देणारी शिक्षण व्यवस्था असणे ही काळाची गरज आहे.
प्रा. यशवंत आबा बोरसे,
श्रीसाई कोचिंग क्लासेस, नाशिक..
राज्य-कायदेशीर सल्लागार
कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरम ऑफ महाराष्ट्र राज्य..


0 Comments